चीनमध्ये या गोष्टी चालणार नाहीत! परदेशीयांना इशारा
जीनिव्हा, दि. 28 – चीनमध्ये परदेशीय व्यापारी वा इतर धंदेवाले लोक येतात त्यांनी कोणती पथ्ये पाळली पाहिजेत ती पेकिंग सरकारने जाहीर केली आहेत, ती अशी – पेकिंगमधील हॉटेलात आपल्या शेजारी मित्राचे अंगावर बर्फाचे खडे फेकता कामा नयेत. तसे केल्यास त्यास देशाबाहेर हाकलून दिले जाईल.
हॉटेलमधील नोकराणीच्या पाठीवर कोणी लाडाने थाप मारली तर त्यासही हीच शिक्षा देण्यात येईल. पाठीवर थाप मारणे ही अत्यंत हीन अभिरुची समजली जाईल. चिनी स्त्रियांशी लघळपणा करणे किंवा त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागास स्पर्श करणे हे अशिष्ट वर्तनात जमा होईल. याला फक्त चिनी स्त्रीसोबत हस्तांदोलनाचा अपवाद असेल.
अशिष्ट वर्तनांत पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्यात- राजकारणाची चर्चा करता कामा नये. मावत्से तुंगची अवहेलना चेष्टा करणे हे चालू दिले जाणार नाही. चिनी लोक अत्यंत प्रामाणिक असतात. त्यांचेवर पूर्ण विश्वास टाकावा. त्यांचा शब्द म्हणजे वचनचिठ्ठीच समजली पाहिजे.
भवानी पेठ पत्र्याची चाळ झोपडपट्टीची सुधारणा
पुणे – झोपडपट्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी महानगरपालिकेने रु. 5 लाखांची तरतूद अंदाजपत्रकात केलेली होती. त्यातून निरनिराळ्या झोपडवस्त्यांमध्ये शौचालय व नळकोडाळी करावयाची होती. परंतु ज्या खासगी मालकांच्या जागेवर झोपडवस्त्या आहेत तेथील जमीन
मालकांची सुधारणा करण्यासाठी संमती मिळविणे ही एक समस्या होऊन बसलेली होती. भवानी पेठेतील पत्र्याची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोपडवस्तीच्या जमीन मालकांची त्याठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी लागणारी संमती पालिकेने मिळविली.