पुणे – कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे येथील नवले उड्डाणपुलावर सतत अपघात होत आहेत. त्याचे तीव्र पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेत सोमवारी उमटले. त्यावर नवले पूल आणि शहरातील अन्य पुलांसंदर्भात तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या काही भागांबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सभागृहात सांगितले.
“नवले पुलावर अपघात होऊन अनेकांना आजपर्यंत जीव गमावावा लागला आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस तेथे अपघात झाले. त्याविषयी अजित दरेकर यांनी हा विषय मुख्य सभेत मांडला. महापालिका आणि “नॅशनल हाय वे ऍथॉरिटी ऑफ इंडिया’ हे एकमेकांकडे बोट दाखवतात. येथील खड्डे दुरुस्तीचा प्रश्नही हद्दीच्या वादात अडकला आहे,’ असे दरेकर म्हणाले.
“सेवा रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. ते काढले जावेत. तेथे येऊन केवळ भेट देऊन फोटो काढण्यात अर्थ नाही. वारज्यात सेवा रस्ते झाले आहेत, परंतु अन्य दुर्लक्ष झाले आहे,’ असे सचिन दोडके म्हणाले.
“चांदणी चौकात पुलाचे काम हाती घेतले, तसा एक प्रकल्प नवले पुलाजवळही उभारावा,’ अशी मागणी दिलीप बराटे यांनी केली. त्यानंतर अन्य सदस्यांनी आपापल्या भागातील उड्डाणपूल तसेच शहर हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाच्या काही भागासंदर्भात प्रश्न मांडले.
महापौर म्हणाले…
नवले पुलावर झालेल्या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वीय सहायकांशी चर्चा झाली आहे. येथील अडचणींवर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या विषयात आम्ही एकत्र बसून आढावा घेऊ आणि त्यानंतर गडकरींशी बोलून त्यांच्यापर्यंत विषय पोहोचवू, असे महापौरांनी नमूद केले. हा नवले पुलाचा किंवा एकूणच महामार्गांचा विषय असेल, त्याचा एकत्रितपणे अहवाल तयार करावा लागेल. त्यासाठी महामार्गाचे काम करणारे अधिकारी, प्रोजेक्ट इंजिनिअर, पोलीस आयुक्त, महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी, गटनेते, वाहतूक उपायुक्त यांना घेऊन दोन दिवसांत महापालिकेत बैठक लावू. तयार झालेला अहवाल गडकरींच्या समोर ठेवू. हा प्रश्न लवकर संपला पाहिजे असे मलाही वाटते, असे महापौर म्हणाले.