जिल्ह्यात केवळ 34 गावे हॉटस्पॉट
पुणे – शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातील करोना संसर्ग कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीणमधील हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही प्रत्येक आठवड्याला लक्षणीय घट होत आहे. मागील आठ दिवसांत पुन्हा निम्याने हॉटस्पॉट गावांच्या संख्येत घट झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ 34 गावे हॉटस्पॉट आहेत. तर, मागील आठवड्यात ही संख्या 76 इतकी होती.
शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फेब्रुवारीनंतर करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढायला लागला. मे-जून महिन्यापर्यंत शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत आहे. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संसर्ग कमी होत नसल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली होती.
जिल्हा परिषदेसह आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात विविध हॉटस्पॉट गावांवर लक्ष केंद्रित करणे यासारख्या उपाययोजना राबवल्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत हॉटस्पॉट गावांची संख्या घटत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत समाधानकारक वातावरण आहे.
तेरापैकी सहा तालुके हॉटस्पॉट मुक्त असून, 7 तालुके हॉटस्पॉट असून, त्यामध्ये चार तालुक्यांतील हॉटस्पॉट गावांची संख्या पाचच्या आत तर तीन तालुक्यांतील हॉटस्पॉट गावांची संख्या दहाच्या आत आहे. दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांना हॉटस्पॉट गावे म्हणून निवडले जात आहे. त्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यात संसर्गाची तीव्रता अधिक होती. त्यावेळी जिल्ह्यात 465 गावे हॉटस्पॉट होती. त्यानंतर ही संसर्गाची तीव्रता कमी झाली आणि मे महिन्यात 397 वरून जून महिन्यात 186 पर्यंत ही संख्या घटली. जुलैमध्ये ही संख्या 103 पर्यंत खाली आली. जुलैपासून संसर्गाची तीव्रता आणखी घटल्याने हॉटस्पॉट गावांची संख्याही कमी
होत गेली.
तालुका अणि हॉटस्पॉट संख्या
आंबेगाव 9, जुन्नर – 7, शिरूर – 8, हवेली – 5, दौंड – 3, खेड आणि मुळशी – प्रत्येकी 1, इंदापूर, पुरंदर, बारामती, भोर, मावळ आणि वेल्हा – एकही नाही