देहूरोड – मानवामध्ये सत, रज, तामसी अशा तीन प्रकारच्या प्रवृती आहेत. एखाद्या रुग्णाची चिकित्सा केल्यावर त्याची पैसे देण्याची जेवढे ऐपत आहे, तेवढे घेऊन उपचार करणे म्हणजे रज, तर जेवढा खर्च आहे, तेवढेच घेणे म्हणजे सत प्रवृत्ती होय. करोनाच्या काळात अनेकांना वाजवीपेक्षा जास्त पैसे घेताना पकडले आहे.
करोनाची टेस्ट न करताच करोनाचे बिल काही डायग्नोस्टिक सेंटरमध्ये घेतले गेले, ही तामसी प्रवृत्ती झाली, असे करू नये तेव्हा आपल्यामध्ये सत्याकडे वळविणारी प्रवृत्ती असावी, असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, आर्यन मॅन कृष्णप्रकाश यांनी देहूरोड येथे व्यक्त केले.
दसऱ्याचे औचित्य साधून देहूरोड येथे मेडआयकॉनिक डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. देहूरोड कॅंटोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक, डॉ. महेश कुदळे, डॉ. मेघा जाधव, डॉ. उन्मेष भोसले, आशिष भोंडवे, आधार रूग्णालयाचे डॉ. गणेश राऊत, डॉ. अभिजित देवरे, शैला भोंडवे, रमेश जाधव, शेखर भोसले, धर्मपाल तंतरपाळे, बाळासाहेब भोंडवे आदी यावेळी उपस्थित होते.
आज विजयादशमी आहे. ही देवी म्हणजे एक शक्ती आहे. ती शांती रूपाने, मातृ, पितृ, व्यवसायात म्हणजे चराचरात वास्तव्य करते. विजयादशमी दिनी या सेंटरचे उद्घाटन केले आहे. आपण सत प्रवृत्तीने सेवा करून या देवीचा सन्मान कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे कृष्ण प्रकाश यांनी मनोगतात व्यक्त केले.