मुंबई – ‘तुला पाहते रे…’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. त्यातच इशाची भूमिका वठविणाऱ्या अभिनेत्री गायत्री दातारला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
या मालिकेमुळे प्रसिद्धीच्याझोतात आलेली गायत्रीला या मालिकेनंतर खूप चांगल्या संधी मिळायला सुरुवात झाल्या होत्या. नाटकातही तिने काम केले होता. यानंतर विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये सुद्धा ती झळकली होती. त्यानंतर आता गायत्री ‘बिग बॉस 3’ मध्ये झळकत आहे. बिग बॉस 3 हा कार्यक्रम सुरू होऊन आता तब्बल तीन आठवडे ओलांडले आहेत.
बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. कदाचित असेच स्वप्न गायत्रीचे सुद्धा असावे. तिने देखील या शोची ऑफर स्विकारली पण त्यामुळे तिला प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागत आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर गायत्री लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार होती.
मात्र, बिग बॉसच्या घरातील तिचा राहणीमान आणि स्वभाव अश्या कारणांमुळे आता सिनेमात काम करण्याची मिळालेली ऑफर तिच्या हातून निसटल्याचे समजतंय. बिग बॉसच्या घरात एंट्री घेण्यापूर्वी ‘बाबू’ या मराठी सिनेमाची गायत्री दातारला ऑफर मिळाली होती.
मात्र, आता या सिनेमातून तिची हकालपट्टी करण्यात आली असून, गायत्रीच्या जागी प्रसिद्ध अभिनेत्री ‘नेहा महाजन’ हिची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता ‘बाबू’ सिनेमात नेहा महाजन मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.