नवी दिल्ली – भारताच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने बालकांसाठी कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी लवकरच करोना लसीचे डोस उपलब्ध होण्याची चिन्हे बळावली आहेत.
भारत बायोटेक या हैदराबादस्थित कंपनीकडून कोव्हॅक्सिनचे उत्पादन सुरू आहे. बालकांसाठी वापर होऊ शकणाऱ्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्या कंपनीने पूर्ण केल्या. त्याविषयीचा डेटा पडताळणीसाठी आणि मंजुरीसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे सादर करण्यात आला.
त्या डेटाची छाननी करून तज्ज्ञ समितीने मंजुरीबाबत शिफारस केली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) पाठवण्यात आली आहे. आता डीसीजीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. देशात सध्या 18 वर्षांवरील वयोगटाचे करोना लसीकरण सुरू आहे.