लंडन – अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेन याला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आता कुरेन आयपीएल स्पर्धेतील उर्वरित लढतींना तर मुकणार आहेच, पण त्याला आगामी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतूनही बाहेर पडावे लागले आहे.
कुरेन यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता. आता कुरेनच्या जागी त्याचाच भाऊ टॉम कुनेरला इंग्लंड संघाने विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात स्थान दिले आहे.
राजस्थान रॉयलविरुद्धच्या सामन्यादरम्यान कुरेनची कंबर दुखावली गेली असून लगेचच त्याच्यावर उपचारही करण्यात आले आहेत. मात्र, यातून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला किमान दीड महिना विश्रांती घ्यावी लागणार आहे.
त्याची दुखापत स्नायूंशी निगडित असून ही दुखापत गंभीर नसून नाजूक आहे, असेही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.