मुंबई – भारतीय क्रिकेटशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे एक अनोखो नाते आहे. जेव्हा भारतीय क्रिकेटला आजच्यासारखी लक्ष्मी प्रसन्न नव्हती तेव्हा या गानसरस्वतीनेच बीसीसीआयला आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटपटूंना मदतीचा हात दिला होता. त्याचेच महत्त्व कायम ठेवत आजही लतादीदींसाठी प्रत्येक सामन्यासाठी एक आसन आरक्षित ठेवले जाते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर मंगळवारी आपला 92 वा वाढदिवस साजरा करत असतानाच त्यांचे भारतीय क्रिकेटसाठीचे अमूल्य योगदान बीसीसीआयनेही साजरे केले. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह देशातील बहुसंख्य क्रिकेटपटूंनी लतादीदींना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
इंदूरमध्ये 28 सप्टेंबर 1929 साली लतादीदींचा जन्म झाला. लतादीदींच्या क्रिकेट प्रेमाशी संबंधित अनेक किस्से आहेत. त्याची सुरुवात 1983 साली झाली, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने विश्वकरंडक जिंकला. त्यावेळी आजच्यासारखे बीसीसीआय गर्भश्रीमंत नव्हते. विश्वविजेत्या संघाला बक्षीस म्हणून देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसेही नव्हते. तेव्हा बीसीसीआयचे पदाधिकारी राजसिंग डुंगरपूर यांनी लतादीदींना कार्यक्रम (चॅरिटी शो) आयोजित करण्याची खास विनंती केली व त्यातून मिळालेल्या रकमेतून खेळाडूंना रोख बक्षिसे देण्यात आली.
यासाठी दीदींनी एकही रुपया मानधन घेतले नव्हते. इतकेच नव्हे तर त्यानंतरही दीदींनी सातत्याने क्रिकेटपटूंसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यासाठीच भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी दीदींसाठी एक आसन आरक्षित ठेवले जाते. आजही या परंपरेत खंड पडलेला नाही.