पुणे – छतातून पाणी गळत असल्याने दुरुस्ती कामासाठी आलेल्या एका कामगाराने घरातून एक लाख २९ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी एका कामगारास अटक करण्यात आली.
श्रेयस भारत कदम (वय 27, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राकेश भगत (वय 28, रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भगत यांचे कोथरूडमधील साईनाथ वसाहतीत दुमजली घर आहे.
त्यांच्या छतातून पाण्याची गळती होत असल्याने त्यांनी छत दुरुस्तीसाठी कदम याला बोलावले होते. गेल्या आठवड्यात छत दुरुस्तीचे काम करताना कदमने भगत यांच्या घरात प्रवेश केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील दागिने लांबविले.
कपाटातील दागिने चोरीला गेल्याचा प्रकार नुकताच निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दुरुस्तीसाठी आलेला कामगार कदमने दागिने चोरल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.संशयावरून कदमला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक रविकांत कोळी तपास करत आहेत.