नागपूर – नागपूरात तीन मित्रांची पार्टी चालू असताना पार्टीमध्ये लावलेल्या गाण्याचा गायक कोण यावरून वाद होऊन मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल रात्री घडली असून आज सकाळी हत्येची माहिती उघड झाली आहे.
आकाश गोंड असे आरोपी मित्राचे नाव असून तुषार मृत मित्राचे नाव आहे. नागपूरच्या केडीके कॉलेज येथे काल रात्री मैत्रिणीच्या फ्लॅटवर तीन मित्रांनी पार्टी आयोजित केली होती. यावेळी हा प्रकार घडला आहे. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, मित्राच्या फ्लॅटवर तीन मित्रांनी पार्टी आयोजित केली होती. पार्टी मध्ये गाणं वाजवत असताना या गाण्याचा गायक कोण यावरून दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला.
पार्टी संपल्यानंतर आरोपी आणि मृतक घरी जायला निघाले. घराजवळ पोहचले असता, परत त्यांचात त्याच गाण्याच्या गायकावरून वाद झाला. वादानंतर आरोपीने घरी जाऊन चाकू आणला त्यानंतर आरोपी आकाशने तुषारवर चाकूने वार केले. नंतर त्यानेच तुषारला रुग्णालयात नेले.
रुग्णालयात जाण्यापुर्वीच तुषारचा जीव गेला. त्यानंतर आकाशने तेथून पळ काढला. दरम्यान पोलिसांनी आकाश आणि त्याच्या मित्रास ताब्यात घेतले आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.