दुशांन्बे (ताजिकीस्तान) – अफगाणिस्तान दहशतवादमुक्त, युद्ध तसंच अमली पदार्थ आणि इतर तस्करीसारख्या गैरप्रकारांपासून मुक्त असे स्वतंत्र, स्वायत्त, तटस्थ, सार्वभौम, शांतताप्रिय आणि लोकशाही राष्ट्र असावे, या आशयाच्या जाहीरनाम्याला शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा दर्शविला आहे.
संघटनेच्या बैठकीनंतर काल दुशान्बे जाहिरनामा सदस्यांसमोर मांडण्यात आला. त्यावेळी सध्याच्या परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये अस्तित्वात असलेले सर्व धार्मिक, राजकीय आणि मानवतावादी गटांचे प्रतिनिधी एकत्र घेऊन सरकार स्थापन करणे कठीण असल्याचे मत सदस्य राष्ट्राच्या प्रमुखांनी व्यक्त केले.
सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आपण निषेध करीत असल्याचे सांगत सदस्य देशांनी दहशतवाद आणि त्यासाठी केला जाणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली. आपापल्या देशात आपण यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी कटिबद्धताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी वेधले कट्टरतावादाकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि अफगाणिस्तानसंदर्भातल्या संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले होते. शांघाय सहकार्य संघटना व्यापक क्षेत्रात वाढत्या कट्टरपंथामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधतानाच हे या प्रदेशातल्या उदारवादी आणि प्रगतीशील संस्कृती आणि मुल्ये यांच्या विपरीत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात सांगितले.
अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या घडामोडीमुळे कट्टरतावादाकडे झुकणारा कल अधिक वाढू शकतो असे त्यांनी सांगितले. संयम, वैज्ञानिक आणि तर्कसंगत विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमावर शांघाय सहकार्य संघटनेला काम करता येईल, या क्षेत्रातल्या युवकांसाठी ते समर्पक राहील असे त्यांनी सुचवले.