पुणे – जिममधील साहित्याची वाहतूक करताना “जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा’, असे बोलल्याने चिडलेल्या कामगाराने व्यवस्थापकावर कोयत्याने वार केले. या प्रकरणात पौड पोलिसांनी श्रीकांत हनुमंत वाळुंज (रा. कुंभेरी, ता. मुळशी) याला अटक केली. न्यायालयाने त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जखमी श्याम पायप्पा पटेल (वय 46, वरिष्ठ व्यवस्थापक, सुविधाप्रमुख) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ऍम्बीव्हॅली सहारासिटी परिसरात जुन्या जिमसमोर 28 ऑगस्ट रोजी दुपारी हा प्रकार घडला.
फिर्यादी हे ऍम्बीव्हॅली सहारासिटी येथे फॅसिलिटी हेड (सुविधाप्रमुख) म्हणून नोकरी करतात. स्पोर्ट्स सेंटरमधील जुन्या जिममधील सामान नवीन जिममध्ये हलविण्याचे काम सुरू आहे. ते करणाऱ्या श्रीकांत वाळुंज याने 25 ऑगस्ट रोजी फिर्यादींना मोबाइलवर कॉल करून “साहित्य शिफ्ट करताना फुटले, तर भरपाई द्यावे लागेल’ असे सांगितले. त्यावर “तुम्ही जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा’ असे फिर्यादी त्यास बोलले होते. त्याचा राग मनात धरून 28 ऑगस्ट रोजी साहित्य हलविण्याचे काम सुरू असताना श्रीकांतने पटेल यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
तसेच दुसरा वार फिर्यादींच्या हातावर लागला. दरम्यान, तेथे असलेल्या इतरांनी श्रीकांत याला पकडले. मात्र, त्यानंतर तो दुचाकी घेऊन पळून गेला. जखमी फिर्यादी पटेल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी वाळुंज याला अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकरी वकील नीलेश लडकत यांनी केली.