अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरले. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे रुळाचे चाव्या (फिश प्लेट) काढण्यात आल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
बडनेरा, अमरावती येथील रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने रविवारी नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर, जयपूर -सिकंदराबाद एक्स्प्रेस दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.
बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथील सोफिया औषनिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा मालगाडीने नेला जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते. मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळाखालून घसरले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी ८ ते १० तास लागणार आहे.