नवी दिल्ली – कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट गत आठवड्यात लॉक करण्यात आले होते. या प्रकारावर पडदा पडतो न पडतो राज्यातील कॉंग्रेस नेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉंग्रेसच्या 5 बड्या नेत्यांच्याविरोधात ट्विटरने कारवाई केली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाऊंटसह बड्या कॉंग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलेले आहेत.
या संदर्भात कॉंग्रेसचे सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले, दिल्लीतील बलात्कार पीडित कुटुंबीयांची कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर ट्विटरने कारवाई केली होती.
राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीसीनंतर ट्विटरने ही कारवाई केली होती. त्यानंतर आता कॉंग्रेस पक्षाच्या पक्षाच्या ट्विटर अकाऊंटसह बाळासाहेब थोरात, अजय माकन, माणिकम टागोर, जितेंद्र सिंह, सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले आहेत. तसेच अनेक कॉंग्रेसच्या कार्यकत्यांचे अकाऊंटही लॉक केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत “मैं भी राहुल’ असे ट्विट केले होते. राहुल यांनी नियमांचे भंग करणारा फोटो शेअर केला होता, त्याच फोटोला पाठिंबा किंवा भूमिकाला पाठिंबा दर्शवणारे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केल्याने त्यांचेही ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले आहे.
नागरिकांच्या विचारांची गळचेपी करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. ट्विटर ही आंतररष्ट्रीय कंपनी असूनही भाजपच्या दाबवाखाली काम करत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही आमचा लढा सुरुच ठेऊ, हम लढेंगे, असा आक्रमक पवित्रा बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.
ट्विटर हे एक समाज माध्यम आहे. त्यावर आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने मत मांडण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या मांडण्याचा अधिकार राज्य घटनेमध्ये आहे. त्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न आम्ही ट्विटरच्या माध्यमातून करत होतो. मात्र ट्विटरने कॉंग्रेस नेत्यांच्या ट्विटरवर कारवाई करण्याची भूमिका घेतली.
भाजपाच्या दबावाखाली काम करणे योग्य नाही. त्यामुळे एकंदरच कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी चाललेली आहे, याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.