पुणे – करोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता, पहिल्या डोस घेतलेल्या नागरिकांना नियोजन करुन प्राधान्याने दुसरा डोस द्यावा, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.
पुणे विधानभवनाच्या सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील करोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
वळसे पाटील यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेवून मनुष्यबळ वाढवा. औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेवून कामगार विभागाशी चर्चा करुन कामगारांना वेळेत लसीकरण करण्यासाठी कक्ष स्थापन करा. लसीकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या शासनाच्या सूचनांचे पालन करा. करोनाच्या मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना दिल्या.
सकारात्मक विचार करण्याच्या सूचना
“दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाशी चर्चा करणार असल्याचे सांगून त्यासाठी प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर सादर करावा. करोनामुक्त गावांचा अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. याबाबतीतही सकारात्मक विचार करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.