राजगुरूनगर – खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरां यांच्यावरील वरील अविश्वास ठराव उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे. अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. खेड पंचायत समिती सभापतीपद पुन्हा एकदा चर्चेत आले असून अविश्वास ठरावाच्या नाट्याची पुन्हा एकदा खेडकरांना उत्कंठा लागली आहे.
शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधात 31 मे रोजी अविश्वास ठराव 11 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झाला होता. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायाधीश एस. सी. गुप्ते आणि एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर 10 जून रोजी सुनावणी झाली. त्यांनतर न्यायाधीश एस. कासावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला, अशी माहिती अपिलार्थींचे वकील रोहन होगले यांनी दिली.
खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर उच्च न्यायालयात सभापती पोखरकर, अमोल पवार आणि ज्योती अरगडे यांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने नवीन सभापती निवडीस 25 जूनपर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर पुढील काही तारखा पडल्या, करोना काळात न्यायालयाचे कामकाज झाले नाही. शेवटी मंगळवारी (दि. 27) न्यायाधीश एस. कासावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यावर, खंडपीठाने अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रसाद दाणी, विवेक साळुंके आणि रोहन होगले यांनी कामकाज पाहिले.
पोखरकर अद्यापही अटकेत
सभापती पोखरकर यांच्यावर 24 मे रोजी शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंड करीत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 4 आणि भाजपच्या एकमेव सदस्य, विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर ठरावाचे समर्थक सदस्य सहलीला गेले होते. दरम्यान ते पुण्याजवळ ज्या रिसॉर्टवर थांबले होते, त्याची माहिती पोखरकर व समर्थकांना मिळाली. त्यानुसार पोखरकर समर्थकांसह त्याठिकाणी गेले व त्यांनी राडा केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. ते अजूनही अटकेत आहेत.
बहुसंख्य सदस्य अद्यापही सहलीवर
खेड पंचायत समितीच्या नाट्य भाग एकमध्ये राजकीय सहलीवर गेलेले बहुसंख्य सदस्यही अजूनही सहलीवरच आहेत. शिवसेनेकडून पुन्हा काही आगळीक होण्याच्या भीतीने, या प्रकरणाचा संपूर्ण शेवट झाल्याशिवाय ते परतण्याच्या मनस्थितीत नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बाजूने आमदार दिलीप मोहिते व शिवसेनेच्या बाजूने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाक्युद्ध पेटले होते.
आता काय घडणार?
खेड पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बहुमत असतानादेखील, शिवसेनेच्याच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने शिवसेनेला अपयश आले अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या सहा सदस्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल, अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि. 9 जून रोजी दाखल केलेला आहे. त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या सहा सदस्यांपैकी एक सदस्य मच्छिंद्र गावडे शिवसेनेच्या गोटात परतले आहेत. आता पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान होताना काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.