बीजिंग – चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या देशाच्या नानजिंग शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असून सोमवारी 76 नवे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ही जानेवारीनंतर नोंद झालेली सर्वाधिक संख्या असल्यामुळे आरोग्य विभागाने या भागात चाचण्या करण्यावर भर दिला आहे.
नानजिंग विमानतळावर मागच्या आठवड्यात काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तसेच व्यापक स्वरुपात करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
करोनाचा धोका पाहता हजारो लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. करोनाबाधित आढळल्यामुळे चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आतापर्यंत चीनमध्ये 92 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी चार हजार 636 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे मुलांना व्हॅक्सिन घेतल्याशिवाय शाळेत पाठवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाचे करोना लसीकरण करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर लसीकरणाशिवाय रुग्णालय आणि बाजारात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.