मुंबई – अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. गेला आठवडाभर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. त्यांना भाजपश्रेष्ठींनी गेल्याच आठवड्यात राजीनामा द्यायला सांगितले होते. पण त्यांनी नेहमीच्या पद्धतीने हो, नाही करीत श्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला होता, तथापि, नंतरच्या घडामोडीत मात्र ते पक्षात एकटे पडत गेले आणि आज अखेर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
मात्र, कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर काँग्रेस आमदाराने खोचक ट्विट केलं आहे. काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी एक प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ च्या नाऱ्याची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. राज्यातील मागील निवडणुकीत त्यांचा मी पुन्हा येईन या विधानावरून त्यांना ट्रोल सुद्धा करण्यात आले.
यावरूनच काँग्रेस नेते आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी कर्नाटकच्या राजकीय घडामोडींवरुन देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील यांनी ट्विट केले आहे की,’मी पुन्हा येईनला… कन्नड भाषेत काय म्हणतात.. ‘ असं ट्विट करत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.