पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात पे ऍण्ड पार्क पॉलिसी लागू करण्यात आली आहे. याच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेने करोनाच्या काळात गोरगरीब नागरीकांना, कामगारांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. मात्र पे ऍण्ड पार्कची अंमलबजावणी करून नागरिकांच्या खिशाला कात्री लावली जात आहे, अशी टीका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पे ऍण्ड पार्कची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याविरोधा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज महापालिका भवनसमोर आंदोलन केले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विशाल वाकडकर म्हणाले की, केंद्र सरकारने मागील सहा वर्षात जीएसटी, नोटाबंदी असे तुघलकी निर्णय घेतले. त्यामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांवर आर्थिक संकट आले आहे. त्यात मार्च 2020 पासून करोनाच्या महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे लाखो नागरीकांचा रोजगार गेला आहे. शहरातील युवकांच्या हाताला काम नाही. उद्योजक, व्यापारी सर्वच आर्थिक अडचणीत आहेत. नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. अशा वेळी हवालदिल झालेल्या कष्टकरी, गोरगरीब कामगारांना, सर्वसामान्य नागरीकांना मदतीचा हात देऊन दिलासा देणे अपेक्षित होते. मदत करण्याऐवजी पिंपरी चिंचवड मधिल भाजपाच्या भ्रष्टाचारी प्रशासनाने सर्व सामान्यांच्या खिश्यावर डल्ला मारला आहे. पे ऍण्ड पार्कचा आदेश ताबडतोब प्रशासनाने मागे घ्यावा, अशीही मागणी विशाल वाकडकर यांनी यावेळी केली.