पुणे – शहरातील माणिकबाग परिसरात राहणार्या एका उच्चशिक्षित तरुणाला इंग्लडच्या नोकरीचे प्रलोभन चांगले महागात पडले आहे. नोकरी तर मिळालीच नाही, मात्र त्या बदल्या 4 लाख 67 हजारांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात उज्वल काकडे (वय 30, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीवर आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उज्ज्वल याने एमएससीचे शिक्षण इग्लंडमधून घेतले आहे. एका वर्षापूर्वी तो भारतात आला होता. भारतात आल्यानंतर तो नोकरीच्या शोधत होता. त्यासाठी त्याने त्याची सर्व माहिती ऑनलाईन अपलोड केली होती. दरम्यान 24 फेब्रुवारीला उज्जवला एक ईमेल आला. त्याला इग्लंडमधील एका नामांकित कंपनीत स्टोअर किपर मॅनेजरची नोकरी असल्याचे सांगून चांगला पगार देण्याचे आमिष दाखविले.
या ईमेलला उज्ज्वल याने प्रतिसाद देत सर्व माहिती पाठविली. त्यानंतर नोकरीसाठी व्हिसाची प्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यासाठी त्याच्याकडून काही रक्कम घेण्यात आली. त्यासाठी आरोपीने एक खाते क्रमांक पाठविला. त्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे पैसे पाठविले.