पुणे – रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली. गुणवंत युवराज पाटील (19 रा. मुंढवा ) व स्वप्नील भागवत बंगले (19 रा. नोबल हॉस्पीटल जवळ, मगरपट्टा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 21 जून रोजी एन.आय.बी.एम.रोड येथे पतीची वाट पाहत असलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल फोन डिओ मोपेडवरुन दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता.
त्याचा समांतर तपास करताना पोलीस हवालदार महेश वाघमारे,अजय गायकवाड, चेतन चव्हाण यांना मिळालेल्या खबरीवरुन दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे तपास करता आरोपी यांनी सांगवी, वानवडी, भोसरी, कोंढवा, चाळीसगाव येथे सुध्दा लोकांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन 50,000/- रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन व 50,000/- रुपये किमतीची डि.ओ.मोपेड असा एक लाख रुपयांचा ऐवज जप्त करणेत आलेला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ शेंडगे,पोलीस अमंलदार रमेश साबळे, विनोद शिवले, विलास खंदारे यांनी केलेली आहे.