अकोला : पूर्णा नदीत ३० वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. हा तरुण नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेला असता हा प्रकार घडला आहे. अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार नजीक असलेल्या ग्राम करतवाडी येथे ही घटना घडली असून अद्याप हा तरुण बेपत्ता आहे. गेल्या दोन दिवसांपासून तरुणाचा शोध सुरु आहे.
दादू प्रकाश सुरडकर, वय ३० असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर दादूसह काही लोक गेले होते. दरम्या दादू हा आंघोळीसाठी नदीत उतरला होता. त्याला वाढलेल्या पाण्याच्या पातळीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो प्रवाहात वाहून गेला. उपस्थितांनी दादूला वाचवण्याचे प्रयत्न देखील केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
बराच वेळ शोधाशोध करूनही तरुण सापडत नसल्यामुळे या घटनेची माहिती दहीहंडा पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेळ वाया न घालवता आपत्कालीन विभागाच्या पथकाला बोलावले. मागच्या दोन दिवसांपासून त्या तरुणाचा शोध लागत नसल्यानं पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक तरुणाचा शोध घेत आहेत.