नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोऱ्या जाणाऱ्या भारताला मागील काही दिवसांपासून घटणाऱ्या बाधित संख्येने मोठा दिलासा दिला आहे. देशात रविवार सकाळपासून 24 तासांत 1 लाख 52 हजार 734 नवे करोनाबाधित आढळले. ती 50 दिवसांतील सर्वांत कमी दैनंदिन बाधित संख्या ठरली आहे.
देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 2 कोटी 80 लाख 47 हजार 534 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत 2 लाख 38 हजारहून अधिक बाधित बरे झाले. त्यामुळे सलग 18 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक ठरले. त्यातून सक्रिय बाधितांची संख्या कमी होऊन 20 लाख 26 हजार 92 इतकी झाली आहे. ते प्रमाण एकूण बाधितांच्या 7.22 टक्के आहे.
बाधित बरे होण्याचा देशातील दर 91 टक्क्यांवर गेला आहे. मागील 24 तासांत देशात 3 हजार 128 बाधित दगावले. त्यामुळे देशात करोनाबाधेने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3 लाख 29 हजार 100 इतकी झाली आहे.