न्यू जर्सी : अमेरिकेतील रोबिंसविले येथे बांधण्यात येणार असलेल्या हिंदू मंदिराचे बांधकाम गेल्या काही दिवसापासून ठप्प झाले आहे. मंदिराच्या बांधकामाचे काम करणाऱ्या मजुरांनी त्यांना कामाच्या प्रमाणात पुरेसा मोबदला मिळत नसल्याची तक्रार केली असून या तक्रारीची दखल घेऊन अमेरिकेतील प्रशासकीय संस्थांनी या मंदिराचे बांधकाम थांबवले आहे.
मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था या संस्थेकडे आहे. अमेरिकेच्या एफबीआय या केंद्रीय तपास संस्थेने मंगळवारी या मंदिराच्या बांधकामाला भेट देऊन तेथे उपस्थित असलेल्या 90 मजुरांचे जबाब नोंदवले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासन या मजुरांना एका तासासाठी 1 डॉलर म्हणजे 73 रुपये वेतन देत होते. अमेरिकेतील मजुरी कायद्याप्रमाणे एका तासासाठी किमान 7 डॉलर वेतन देणे सक्तीचे आहे. राष्ट्रपती जो बाईडन यांनी हा दर 7 डॉलरवरून वरून 15 डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेत अशी परिस्थिती असताना या भारतीय मजुरांना मात्र फक्त एक डॉलर वेतन दिले जात असल्याने त्यांनी तक्रार केली आहे. त्याशिवाय त्यांना सकाळी साडेसहा ते रात्री साडेसात पर्यंत काम करावे लागत आहे.
अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे कामाचे हे तास हि खूप जास्त आहेत. मंदीर निर्माण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कानू पटेल यांनी मात्र मजुरांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. या मजुरांच्या वेतनाचा काही भाग भारतातील त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो असा दावा त्यांनी केला आहे.