धक्कादायक ! तिघांच्या मृत्यूचा घेतला धसका; हडपसर येथील कॅनोलमध्ये उडी घेऊन करोनाबाधित महिलेची आत्महत्या

पुणे, दि. 13 – रुग्णालयामध्ये तिघा करोना रुग्णांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने घाबरलेल्या ज्येष्ठ करोनाबाधित महिलेने आत्महत्या केली. तिने नाना पेठेतील रुग्णालयातून पळ काढून हडपसर येथील कॅनोलमध्ये उडी मारली.

संबंधित महिला रुग्णालयातून पळून गेल्यावर समर्थ पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद दाखल झाली होती. दरम्यान, रविवारी सकाळी हडपसर येथील मुठा कालव्यात 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची ओळख समर्थ पोलिसांनी पटवली.

समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दैनिक “प्रभात’ला सांगितले, आम्हाला हडपसर पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली. त्यानुसार आमच्या पथकाने बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. तिचे कपडे आणि इतर वर्णन तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितल्या प्रमाणे होते. त्यांनी तिची ओळख पटविली. हडपसर पोलिसांनी यासंदर्भात यापूर्वीच अकस्मात मृत्यूचा (एडी) गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून त्या महिलेने आत्महत्या केल्याचा संशय आहे.

सदर महिलेवर गणेश पेठेतील खासगी रुग्णालयात दाखल होती. तिच्या समोर दाखल झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर ती नैराश्‍यात गेली. तिने तिच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितले. तिची मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन कुटुंबातील सदस्यांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.

तिला 6 मे रोजी नाना पेठेतील दुसऱ्या रुग्णालयात हलवले. शनिवारी पहाटे ती कोणासही न सांगता रुग्णालयाच्या आवारात निघून गेल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.