पिंपरी (प्रतिनिधी) – टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आयटी अभियंत्याने आत्महत्या केली. हिंजवडी आयटी पार्क फेज दोन येथील इन्फोसिस कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
रणजितसिंग किसनसिंग राठोड (वय २२), असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता असलेला रणजितसिंग राठोड हा इन्फोसिस कंपनीत नोकरीला होता. दरम्यान, गुरुवारी (दि. ११) त्याने गेस्ट हाऊसमध्ये बाथरुममध्ये टाॅवेलच्या साह्याने गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राठोड यांना बेशुद्धावस्थेत खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वी मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राठोड याच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही.
पोलिसांनी राठोड याच्या खोलीतून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत. उपनिरीक्षक पंडित अहिरे तपास करीत आहेत.