मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सावध भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच वक्तव्याचा कित्ता गिरवला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide case) प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल. परंतु गेल्या काही दिवसांत एखाद्याला आयुष्यातून उठविण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोणी दोषी वाचता कामा नये तसेच कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. यामुळे जे सत्य असेल ते जनतेसमोर येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा तिच्यासोबत दोघेजण उपस्थित होते. तिला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेल्यावर शेजाऱ्यांनी फैलावर घेतल्यावर या दोघांपैकी एका तरुणाने कथित मंत्र्यासोबतच्या संभाषणाच्या क्लीप या स्थानिकांना दिल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील सावध प्रतिक्रिया देताना मला याबाबत अद्याप माहिती नाही, पूर्णपणे माहिती घेऊन यावर बोलेन, असं म्हटले होते.