मंडला – मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ठार झालेले दोन नक्षलवादी 25 ते 30 या वयोगटातील आहेत. त्यातील एक महिला आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिली.
तेथे लपलेले नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराला चकमक सुरू झाली, ती चकमक शनिवारी पहाटेपर्यंत सुरू होती. दोन्ही बाजूंकडून किमान दीडशे फैरी झाडल्या गेल्या असे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या बाजूकडून होणारा गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तेथे दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.
मृत नक्षलवाद्यांकडे एक वन नॉट 303 या बनावटीची रायफल आणि पॉईन्ट 315 बोरची रायफल सापडली. नक्षलवादाचा प्रसार करणारे साहित्यही त्यांच्या जवळ आढळून आले. मंडलाचा हा भाग छत्तीसगडच्या सीमेला लागून येतो. मंडलात नक्षलवादी मारले गेल्याची ही पहिलीच घटना आहे.