ढाका – बंगालदेशमधील प्रकाशक फैसल अरेफिन दीपन यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादविरोधी विशेष न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर 2015 मध्ये फैसल अरेफिन दीपन यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी “अन्सरुल्ला बांग्ला टीम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंदी घातलेल्या अन्सार-अल इस्लाम संघटनेच्या आठ सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
दीपन हे जागृती प्रकाशोनीचे प्रकाशक होते. त्यांनी ब्लॉगर आणि विज्ञान लेखक अविजित रॉय यांची पुस्तके प्रकाशित केली होती. अविजित रॉय यांची देखील अन्सार-अल इस्लाम या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये ढाका येथे हत्या केली होती. अविजित रॉय हे एक निरीश्वरवादी, धर्मनिरपेक्ष लेखक आणि कार्यकर्ते होते. त्यांनी धार्मिक अतिरेकीवाद, अंधश्रद्धा आणि रूढीवादाविरोधात लिखाण केले होते.
अन्सार अल इस्लामचे दोषी ठरवले गेलेला वरिष्ठ कमांडर सईद झियाउल हक आणि म्होरक्या हसन शमीम हे दोन आरोपी फरार आहेत. तर उर्वरित सहा जण तुरूंगात आहेत. झियाउल हक हा बांगलादेशाच्या लष्करात मेजर पदावर होता. मात्र 2012 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचल्यामुळे त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आले. नंतर तो अन्सार-अल इस्लाममध्ये दाखल झाला होता.
या हत्येचा हेतू राज्यातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही नष्ट करणे हा होता. लेखक आणि प्रकाशकांचा आवाज बंद करण्यासाठी आणि भाषणे थांबवण्यासाठी, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे हत्याकांड करण्यात आले असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.