पुणे – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अमृता करवंदे यांना आपल्या एमबीए शिक्षणक्रमास विनाशुल्क प्रवेश देऊन पुढील दोन वर्षे त्यांना विद्यापीठाने मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. यानिमिताताने विद्यापीठाने आपली समाजिक बांधीलकी जपली असून समाजातील अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी एक नवीन मार्ग अवलंबिला आहे.
अमृता करवंदे या बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांची जन्म कहाणी अनाथांना प्रभावित करणारी आहे. विद्यापीठाने त्यांना विनाशुल्क प्रवेश दिल्यानंतर त्यांना स्वयंअध्ययन साहित्य वितरणाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, कोथरूड या एमबीए शिक्षणक्रमाच्या मान्यता प्राप्त अभ्यासकेंद्रात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी करवंदे यांना एमबीए शिक्षणक्रमाचे अभ्याससाहित्य देऊन सन्मान करण्यात आले.
यावेळी करवंदे यांनी त्यांचा आतापर्यंतचा प्रवास सांगितला. वयाच्या 18 वर्षापर्यंत त्यांचा सांभाळ व शिक्षण मातृछाया आश्रम, गोवा येथे अनाथालयात राहून पूर्ण झाले. मात्र, सज्ञान झाल्यानंतर त्यांना आश्रम सोडावा लागला. आश्रमातील व्यवस्थापनाने त्यांना विवाह करण्यासाठी प्रस्तावित केले. परंतु त्यांना पुढे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी आश्रम सोडून पुण्यात येण्याचा निर्णय घेतला व पुणे येथील सेवा सदन संस्थेत राहून पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा देवून 2018 मध्ये तहसीलदार पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.
मात्र, त्यांच्याकडे जन्मतारीख, जातीचा व नॉंन-क्रिमीलेयरचा दाखला नसल्यामुळे एक गुणामुळे त्यांची गुणवत्ता डावलण्यात आली. मात्र, त्यांनी हार न पत्करता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून अनाथांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. महाराष्ट्र शासनानेही त्याची दखल घेऊन अनाथांना शासकीय सेवेत व शिक्षणात अनाथांसाठी 1 टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमीत केला. करवंदे यांचे हे यश अनाथांसाठी क्रांतिकारक ठरले आहे.
करवंदे यांनी एम.बी.ए. शिक्षणक्रमासाठी विनाशुल्क प्रवेश देण्यास मान्यता दिल्याबद्दल सहायक कुलसचिव हिरालाल माळवे यांचे आभार मानले. मुक्त विद्यापीठाचा एम.बी.ए. शिक्षणक्रमासाठी अभ्यासकेंद्र शुल्क माफ करून त्यांना पुढील कालावधीत आवश्यक ते सर्व सहकार्य अभ्यासकेंद्राकडून देण्याचे आश्वासन दिले. अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक गोविंद नामदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.