वॉशिंग्टन – जो बायडन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवर चर्चा झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. भारत आणि अमेरिका या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांच्या प्रमुखांमधील चर्चा सकारात्मक झाली असून भारतसोबत संबंध दृढ करण्याचा बायडेन प्रशासनाचा इरादा असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यातील प्राथमिकता असणारे मुद्दे, प्रादेशिक मुद्यांवर देखील उभय नेत्यांमदध्ये चर्चा झाली. मोदींनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणातील बदलांबद्दल दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असणाऱ्या व्हाइट हाउसनेही या चर्चेबाबत निवेदन जारी केले आहे. नरेंद्र मोदी आणि बायडेन यांच्यात दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याबद्दल चर्चा झाली. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये लोकशाही मजबूत करण्यावर आणि तिचा प्रसार करण्यावर चर्चा झाली.
अमेरिकेचे भारताशी संबंध अगदी घट्ट असल्याचे बायडेन यांनी यावेळी स्पष्ट केले. तर अमेरिकेतील भारताचे राजदूत टी. एस. संधू यांनी भारत आणि अमेरिका दोन्ही देश मिळून जागतिक आव्हानांचा सामना करणार असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देश द्विस्तरीय संबंध मजबुत करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
डेमॉक्रॅटिक पक्षाकडून विजयी झालेले जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. तर, उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा 20 जानेवारीला पार पडला. त्यानंतर जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी बायडेन आणि हॅरिस यांचे ट्विटद्वारे अभिनंदन केले होते.