शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील खळबळजनक घटना
शिक्रापूर – सापाचे नाव घेताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो, तर अनेकदा साप चावल्यानंतर साप बिनविषारी असला तरी नागरिक व त्यांचे नातेवाईक जास्तच घाबरून जातात. परंतु चावलेल्या सापासह सर्पदंश झालेला युवक व त्याचे नातेवाईक शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्याची घटना हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथे घडली आहे.
हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील ज्ञानेश्वर गावडे हा 19 वर्षीय युवक सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेतात काम करत असताना त्याच्या पायाला अचानक साप चावला. त्यावेळी त्याने आरडाओरडा केल्याने वडील दगडू गावडे यांनी त्या सापाला पोत्यामध्ये पकडले आणि लगेचच हिवरे कुंभारचे माजी सरपंच अमोल जगताप व रेवणनाथ जाधव यांच्या मदतीने सापाला सोबत घेऊन शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय गाठले,
यावेळी चावलेला साप देखील आम्ही गाडीमध्ये आणला असून सदर साप घोणस जातीचा असावा असा अंदाज असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांनी ज्ञानेश्वर गावडे याच्यावर उपचार सुरू करत महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शेरखान शेख यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शेख व श्रीकांत भाडळे यांनी तातडीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेत सापाची पाहणी केली असता तो डुरक्या घोणस जातीचा बिनविषारी साप असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी डॉ. काशीद, सरपंच अमोल दरेकर आणि सर्पमित्रांनी साप बिनविषारी असल्याचे सांगत गावडे कुटुंबियांना धीर दिला. तर गावडे कुटुंबीयांनी देखील डॉ. काशीद आणि सर्पमित्रांचे यांचे आभार मानले.
यावेळी साप चावल्यानंतर नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घ्यावेत, असे आवाहन शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैज्यनाथ काशीद यांनी यांनी केले आहे. त्यांनतर सदर सापाला सर्पमित्रांनी निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.