- पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश द्या
- शिक्षण समिती सभापती व सदस्यांचा स्थायीच्या सभागृहाबाहेर ठिय्या
पिंपरी – गुरुवारपासून शहरातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करण्याची मागणी शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांनी केली होती. मात्र सध्या आयुक्त श्रावण हर्डीकर सुट्टीवर असल्याने गणवेश वाटप रखडले आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व स्वेटरचे वाटप करण्यात यावे यासाठी शिक्षण समितीच्या सभापती व सदस्यांनी ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थी उघड्यावर आयुक्त सुट्टीवर अशा घोषणा देत शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, शिक्षण समिती सदस्या प्रियंका बारसे व नगरसेविका अश्विनी वाघमारे यांनी आंदोलन केले. स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत आयुक्तांचा निषेध केला.
करोना विषाणू संसर्गामुळे पिंपरी चिंचवडमध्ये गेली दहा महिने शाळा बंद होत्या. मात्र, सध्य स्थितीत शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने माध्यमिक व प्राथमिक शाळा सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळा आजपासून सुरु करण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसांपासून गणवेश वाटप करण्याची मागणी शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांनी केली.
पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. करोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देखील व्यवस्थित मिळालेले नाही. या वर्षात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील मिळालेले नाही. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये गोरगरीब, मागासवर्गीय, दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश, स्वेटरसह शालेय साहित्य लवकरात लवकर देण्यात यावेत. तसेच महापालिकेच्या माध्यमिक शाळा सुरु होऊन देखील त्या विद्यार्थ्यांना आजही शालेय साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे आता 4 फेब्रुवारीपासून प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर वाटप करण्यात यावे, अशी मागणी मनिषा पवार यांनी केली.
करोना महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. सामान्य कुटुंबातील नागरिकांना दोन वेळचे पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेऊन देण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी महापालिकेने गणवेश वाटप केल्यास चांगला आर्दश निर्माण होईल. त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावे.
– मनिषा पवार, सभापती, शिक्षण समिती, पिं. चिं. महापालिका