पाचगणी (प्रतिनिधी) – जावळी तालुक्यातील महू धरणाजवळ एका वळणावर एसटी बस (एमएच-14-बीटी-1533) आणि मोटारसायकल (एमएच-11-सीयू-0962) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, बस धरणाच्या बाजूला कठड्यावर गेली; परंतु बस तेथेच अडकल्याने प्रवासी सुदैवाने बचावले.
पाचवड-पाचगणी एसटी बस रविवारी सायंकाळी सहा वाजता महू धरणावरील एका वळणावर आली असता, पाचगणीहून आलेली मोटारसायकल बसला धडकून रस्त्याकडेला जाऊन पडली.
बसचालकाने प्रसंगावधान राखून मोटारसायकलस्वाराला वाचवायचा प्रयत्न केला. त्यामध्ये बस धरणाच्या बाजूला कठड्यावर धडकली. त्यातील एक कठडा तुटून खाली पडला; परंतु दुसऱ्या कठड्याला बस अडकल्याने अनर्थ टळला.
बसमध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यातील कुणालाही दुखापत झाली नाही. मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला काही ग्रामस्थांनी तातडीने दवाखान्यात नेले. महू व दापवडीचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले होते.