‘या’ देशात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता; जगभरात चर्चा

लिस्बन – इच्छामरण हा नेहमीच जगभरात चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच एका देशाने इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक पास केले आहे. पोर्तुगालने नुकतच इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली आहे.

या विधेयकाच्या बाजूने 136, तर विरोधात 78 लोकांनी मतदान केले. हे विधेयक आता मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार आहे. या विधेयकावर त्यांनी स्वाक्षरी केल्यावर हा कायदा अंमलात येणार आहे. या कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर पोर्तुगाल इच्छामृत्यूला कायदेशीर ठरवणारा युरोपातील चौथा आणि जगातील सातवा देश ठरेल.

मात्र कॅथलिक धार्मिकांकडून या कायद्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. कॅथलिक पोर्तुगालचा सर्वात मोठा धर्म आहे. याशिवाय 12 खासगी संस्थांनीही हा निर्णय आणि कायदा मागे घेतला जावा अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे.

स्टॉप युथनेशिया मुव्हमेंटने म्हटले आहे की, आजच्या या काळात हजारो लोक आणि संस्था मानवी जीवन वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. अशावेळी इच्छामृत्यूला मंजुरी देणे म्हणजे या कार्याचा अवमान करणे आहे.

दरम्यान, नेदरलॅंड्‌स, बेल्जीयम, कोलंबिया, लग्जम्बर्ग, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी आजवर इच्छामरणाला मान्यता दिलेली आहे. ब्रिटनसह युरोपचे अनेक मोठे देश इच्छामृत्यूच्या विरोधात आहेत. अनेक वर्षांच्या वादानंतर कॅनडाने 2016मध्ये इच्छामृत्यूला मान्यता दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.