पाटणा – सोशल मीडियातून राज्य सरकार, त्यांचे मंत्री किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणी टीका करणाऱ्या पोस्ट केल्या तर त्यांच्या विरोधात सायबर क्राईम कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश बिहारच्या राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. तथापि, त्याविषयी जोरदार वादंग माजल्यानंतर त्यावर सारवासारवही करण्यात आली आहे. सरकारच्या विरोधातील विधायक टीकेचे स्वागतच केले जाईल पण खोट्या आणि अफवा पसरवणाऱ्या पोस्टच्या संबंधातच कारवाईचा हा आदेश होता, असे स्पष्ट करीत घुमजावही करण्यात आले आहे.
यावरून जे वादंग निर्माण झाले होते त्या संबंधात बोलताना अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्रकुमार यांनी सांगितले की लोकशाहीत विधायक टीका ही अपेक्षितच असते, पण ही टीका करताना भाषेचीही मर्यादा सांभाळली गेली पाहिजे. तथापि सोशल मीडियावर होणारा आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळण्यासाठी, अफवांचे प्रकार रोखण्यासाठी आणि खोट्या बातम्या पसरवण्याचे प्रकार थांबवण्यासाठी कालचा आदेश देण्यात आला आहे. सोशल मीडियातून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कडवट स्वरूपात टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी काल रात्री संबंधित यंत्रणांना सायबर क्राईमच्या कायद्याअंतर्गत याप्रकरणी कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांचा उल्लेख भ्रष्टाचाऱ्यांचे भीष्म पितामह आणि गुन्हेगारांचे संरक्षक असा ट्विटरवर केला. या ट्विटर संदेशानुसार नितीशकुमारांनी आपल्याला अटक करून दाखवावी, असे आव्हानही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.