अण्णा हजारे यांच्या मनधरणीचा फडणवीस यांच्याकडूनही प्रयत्न; चर्चा अखेर निष्फळच

– शशिकांत भालेकर

पारनेर – देशातील शेतकर्‍यांशी निगडित विविध मागण्यांसाठी येत्या 30 जानेवारीपासून अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला शेतकर्‍यांशी निगडित मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी आणखी काही अवधी द्यावा. तसेच अण्णांनी या संदर्भातील उपोषण करू नये, अशी मनधरणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणमध्ये सायंकाळी उशिरा दाखल झाले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी त्यांनी चर्चा सुरू केली. मात्र, ती चर्चा निष्फळ ठरली असून अण्णा अपोषणावर ठाम आहे. ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी आमदार बाबुराव पाचर्णे आदी नेते या चर्चेत सहभागी झाले होते.

शेतमालास हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसह शेतकर्‍यांशी निगडित विविध मागण्यांसाठी येत्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात अण्णा उपोषण आरंभणार आहेत. ते उपोषण आंदोलन थांबवावे, यासाठी आज सायंकाळी उशिरा फडणवीस, महाजन, विखे पाटील यांचे राळेगणसिद्धीत आगमन झाले होते.

स्वामिनाथन आयोगाने सूचविलेल्या प्रस्तावानुसार शेतीमालास हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, यासाठी हजारे यांनी यापूर्वी 2018 व 2019 मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी पंतप्रधान कार्यालय, तत्कालीन कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत तसेच कृषिमंत्री राधामोहन सिंह व स्वत: फडणवीस यांनीच हजारे यांना लेखी आश्वासन दिले होते.

या लेखी आश्वासनला तीन वर्षांचा कालखंड उलटून गेल्यानंतरही केंद्रातील मोदी सरकारने त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे अण्णा हजारे केंद्र सरकारवर नाराज आहेत. त्यासाठी हजारे यांनी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला. परंतु त्याचेही उत्तर सरकारने दिलेले नाही. त्यामुळे यावेळी अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेतून अण्णांनी नव्याने काय भूमिका घेतली, यासंदर्भातील माहितीचा तपशील हाती लागला नाही.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केलेल्या मागण्याबाबत प्राथमिक बोलणी झाली असून, याबाबतचे निर्णय करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. अण्णांनी केलेल्या मागण्या केंद्र सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती चर्चेतून जाणून घेतली. त्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या पत्राबाबत अभ्यासपूर्ण उत्तर द्यावी लागणार असल्याने याबाबतच्या मसूद्याबाबतही चर्चा झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.