नवी दिल्ली – दिल्लीतील तापमान अजूनही थंडच असून थंडी बरोबरच तेथे सध्या धुक्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. या धुक्यामुळे समोरचे काहीही दिसणे अवघड बनत आहे. त्यामुळे वाहने हळूहळू आणि जपूनच चालवावी लागत आहेत.
दिल्लीतील पारा सध्या चार अंशावर आला असून ही थंडीची स्थिती रविवार पर्यंत तरी कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. रविवारी तापमान नऊ अंश सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुर्वेकडून वाहणारे वारे आणि ढगाळ परिस्थित तेथे येत्या दोन-तीन दिवसांत वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल. तथापि रविवार पर्यंत तापमान वाढून थंडीचे प्रमाण कमी होणार असले तरी सोमवार पासून पुन्हा दिल्लीत थंडीवाढू लागेल असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.