बिजींग – करोनाच्या काळामुळे व्यवसाय व आर्थिक उलाढालीत कमालीची घट होऊन सुद्धा चीनने आपला विकास दर शुन्याच्यावर राखण्यात यश मिळवले असून सन 2020 या वर्षात चीनचा विकास दर 2.3 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
अर्थात गेल्या 45 वर्षातील चीनची जीडीपी मधील ही नीचांकी कामगीरी आहे. पैशाच्या स्वरूपात चीनची अर्थव्यवस्था 15.42 ट्रीलयन डॉलर्स इतकी नोंदवली गेली. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटेस्टीक्सने आज ही आकडेवारी जाहीर केली आहे.
सन 2020 या वर्षातील पहिल्या तीन महिन्याच्या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के इतकी घट नोंदवली गेली होती. दुसऱ्या तिमाहीत मात्र त्यांनी करोनावर मात करून अर्थव्यवस्थेत चांगली उभारी धरली होती. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत चीनने स्थीरपणाने आर्थिक विकास साधला.
ही अर्थव्यवस्था इतक्या लवकर उभारी धरेल किंवा विकासाच्या दिशेने चालू लागेल असे चिनी सरकारनेही अपेक्षित धरले नव्हते. तथापि मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीच्या बळावर त्यांनी आर्थिक स्थीतीला बळ दिले. या वर्षाच्या काळात चिनचे जॉब मार्केट 5.6 टक्क्यांनी विस्तारले.
सरकारने हे मार्केट 6 टक्क्यांनी विस्तारण्याचे लक्ष निर्धारीत केले होते. सन 2020 या वर्षात चीन मध्ये एकूण 1 कोटी 18 लाख 60 हजार नवीन शहरी नोकऱ्या निर्माण केल्या. चीन मधील सध्याचा बेकारीचा दर 5.2 टक्के इतका आहे.