नगर (प्रतिनिधी) – बाळ बोठे याच्या अटकेसंदर्भातील स्टॅंडिंग वॉरंटचा आदेश आज राज्यातील पोलीस ठाण्यांनाही पाठविण्यात आला. आता राज्यातील पोलीसही संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे शोध घेण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यातील साधारणतः अकराशे पोलीस ठाण्यांत बोठे याच्या स्टॅंडिंग वॉरंटचा आदेश पोच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या विरोधात बुधवारी (ता. 6) पारनेर येथील न्यायालयाने स्टॅंडिंग वॉरंट जारी केले. त्याच दिवशी आदेशाच्या प्रती सर्वच पोलीस ठाण्यांत पाठविण्याची प्रक्रिया तपासी अधिकारी व पोलीस दलाने सुरू केलेली आहे.
काल जिल्ह्यातील बहुतेक पोलीस ठाण्यांना हा आदेश पाठविण्यात आला होता. आज राज्यातील पोलीस ठाण्यांत या स्टॅंडिंग ऑर्डर आदेशाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. त्यातही बोठे हाती न लागल्यास त्याच्या अटकेसाठी आता “अटक वॉरंट’ काढले जाईल, अशी माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली.
रेखा जरे पाटील यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रात्री हत्या झाली. ती सुपारी देवूनच झाल्याचे 1 नोव्हेंबरला स्पष्ट झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2 डिसेंबरला यातील सूत्रधार बाळ बोठे असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गुन्ह्यात नाव घोषित होताच 2 डिसेंबरपासून बोठे पसार झाला. तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. त्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत जवळपास पाच जणांना अटक केली आहे.
दरम्यान, बोठे याच्यावतीने येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे बोठे याच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. तथापि, अजून त्या अर्जावरील सुनावणीची तारीख देखील स्पष्ट झालेली नाही. ही सुनावणी कधी होणार? व त्यावरील निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.