नागपूर – चित्रपटांचे अनुकरण करणे, नायक-नायिकांच्या फॅशनची कॉपी करणे अशा गोष्टी समाजात नेहमीच आणि सर्वत्र घडत असतात. मात्र, यातून फारसे कुणाचे नुकसान होत नसते. फारतर फॅशन इंडस्ट्रीला चालना मिळत असते. मात्र, एका गाजलेल्या अश्लील चित्रपटातील शरीरसंबंधाचे अनुकरण करताना, दाम्पत्यामधील बेरोजगार पुरुषाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना नागपूरजवळच्या एका खेड्यात घडली आहे.
ही धक्कादायक घटना गुरूवारी रात्री नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्याजवळील दहेगाव रंगारी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. जियाउद्दीन (वय 27, रा. टेकानाका) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जियाउद्दीन हा अभियंता असून तो बेराजगार होता.
गत काही वर्षांपासून जियाउद्दीनचे खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघे अनेकदा एकांतात भेटत असत. गुरूवारी दुपारी जियाउद्दीन हा तरुणीला घेऊन दहेगाव रंगारी येथे आला. दहेगाव रंगारी येथे फिरल्यानंतर दोघेही लॉजवर गेले. त्यांनी खोली भाड्याने घेतली. त्यांनी मोबाइलवरच अश्लील चित्रपट बघितला. चित्रपटातील दृष्याचे अनुकरण करण्याचे या दोघांनी ठरविले. तरुणीने जियाउद्दीनचे हातपाय दोरीने बांधले. गळ्याभोवती दोरीही आवळली.
त्या अत्यंत आक्षेपार्ह आणि उत्तान दृष्याचे दोघांनी अनुकरण केले. नंतर तरुणी स्नानगृहात गेली. दहा मिनिटानंतर तरुणी स्नानगृहातून बाहेर आली. जियाउद्दीन हा खुर्चीवरच बसलेल्या अवस्थेत होता. तिने त्याला आवाज दिला. जियाउद्दीन याने प्रतिसाद दिला नाही. तरूणीने जियाउद्दीनला जागे करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान जियाउद्दीन हा खुर्चीसह खाली पडला. त्याच्या गळ्याभोवती फास आवळला गेल्याने त्याचा मृत्यु झालेला होता.
जियाउद्दीन प्रतिसाद देत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तरुणीने आरडाओरड केली. लॉज व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांनी खोलीत धाव घेतली. जियाउद्दीन मृतावस्थेत पडल्याचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जियाउद्दीनचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. तरुणीच्या माहितीवरून खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.