बार्सिलोना – जागतिक स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने एथलेटीको बिल्बोव संघाचा 3-2 असा पराभव केला व स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली.
सामन्याला सुरुवात झाल्यावर केवळ तिसऱ्याच मिनिटाला बिल्बोवच्या इनेक विल्यम्सने गोल केला. त्यानंतर 14 व्या मिनिटाला पेड्रीने बार्सिलोनाचा पहिला गोल केला व संघाला बरोबरी साधून दिली. पहिला हाफ संपण्यापूर्वी मेस्सीने आपली जादू दाखवत 38 व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली.
दुसरा हाफ सुरू झाल्यावरही मेस्सीने आपले वर्चस्व कायम राखताना 62 व्या मिनिटाला गोल केला व बार्सिलोनाची आघाडी 3-1 अशी वाढवली. ते हा सामना सहज जिंकणार असे वाटत असतानाच 90 व्या मिनिटाला बिल्बोवच्या इकर मुनियानिनने गोल केला व सामन्यात रंगत निर्माण केली. अर्थात त्यानंतर बार्सिलोनाने बचाव आणखी भक्कम केल्याने सामना बरोबरीत सोडवण्याचे बिल्बोव संघाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.
या विजयाच्या जोरावर बार्सिलोनाने गुणतालिकेत 31 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. 38 गुणांसह एथलेटीकोचा संघ पहिल्या स्थानावर असून रेयाल माद्रीद 36 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.