जानेवारी अखेर जायकाच्या निविदा?

11 कामांसाठी एकच निविदा : महापालिकेची धावपळ सुरू

 

पुणे – दिवसेंदिवस वाढत्या जलप्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुळा-मुठा नदीला पुनरूजीवन देण्यासाठी महापालिकेकडून जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याच्या फेरनिविदा जानेवारी अखेरपर्यंत काढण्याच्या सूचना केंद्राच्या जलशक्‍ती मंत्रालयाकडून या संबंधिच्या सूचना आल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यासंबंधिची तयारी केली आहे. त्यानुसार सर्व प्रकल्पांतील सर्व कामांची एकच निविदा निघणार आहे. दरम्यान, या निविदा महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीसमोर ठेवण्यात आल्या आहेत.

शहरात तयार होणाऱ्या मैलापाण्यावर 100 टक्‍के प्रक्रिया करून मुळा-मुठा नद्या प्रदुषणमुक्‍त करण्यासाठी महापालिकेने नदी सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्राने जपानच्या जायका कंपनीच्या माध्यमातून 910 कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. त्यानुसार नव्याने अकरा मैलापाणी केंद्र आणि 55 किमीच्या मैलापाणी वाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशासनाने पहिल्या टप्यात 4 वेगवेगळ्या पॅकेजमध्ये निविदा काढून त्यानुसार या प्रकल्पाची कामे करण्याचा निर्णय घेतला होता.

2015 मध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जायका आणि महापालिकेत करार झाला होता; तर 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. या प्रकल्पास मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेने आपण स्वत: या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, हे काम पालिकेस झेपणार नसल्याचे तसेच पालिकेमुळे प्रकल्पास दिरंगाई होईल असे सांगत; केंद्राने या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची जबाबदारी आपल्याकडे ठेवली त्यानंतर तब्बल दीड वर्षाने सल्लागार नेमल्यानंतर मागील वर्षी निविदा प्रक्रिया सुरू झाली.

मात्र, या निविदा चढ्या दराने आल्याने याबाबत मोठा गोंधळ झाला. त्यामुळे, या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर आता नुकतीच केंद्राच्या जलशक्‍ती विभागाने बैठक घेतली. याला केंद्रिय मंत्री प्रकाश जावेडकर व गजेंद्र शेखावत उपस्थित होते. त्यात जानेवारी अखेरपर्यंत या प्रकल्पाच्या निविदा काढण्याच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.