- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्याकडून स्पष्ट
- परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार
पुणे – देशात सीबीएसई बोर्डाच्या शाळा ग्रामीण भागातही आहेत. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार नसल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले.
एवढेच नव्हे, तर येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या घेतल्या जाणार नाहीत. त्याची तारीख नंतर कळविली जाणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
देशभरातील शिक्षकांसोबत मंगळवारी पोखरियाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याचे वातावरण, परिस्थिती ही बोर्डाच्या परीक्षा घेण्यास अनुकुल नसल्याचे म्हटले. यामुळे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये परीक्षा होण्याची शक्यता नाही. परीक्षा कधी घेतली जाईल याचा निर्णय नंतर घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
परीक्षा रद्द होणार नाहीत…
तसेच पोखरियाल यांनी परीक्षा रद्द करण्याबाबतही मत मांडले. परीक्षा रद्द केल्यास आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले तर तो त्यांच्यावर एक शिक्का बसेल. पुढे जाऊन या विद्यार्थ्यांना नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळण्यास अडचणी येतील. ही परिस्थिती आपण विद्यार्थ्यांवर येऊ देणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द होणार नाहीत. परंतु पुढे ढकलण्यात येतील. परीक्षांचा निर्णय फेब्रुवारीनंतर घेतला जाईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले.