नवी दिल्ली – कच्चा माल महागल्याचे कारण दाखवून वाहन कंपन्यांनी आपल्या विविध उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचे सत्र चालूच ठेवले आहे.
होंडा कार्स इंडिया कंपनीने वितरकांना दरवाढ करणार असल्याचे कळविले आहे. मात्र कंपनीने याचा तपशील दिलेला नाही. जानेवारी महिन्यापासून ही दरवाढ अंमलात येणार आहे.
महिंद्रा कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत गेल्या आठवड्यातच वाढ जाहीर केली होती. आज या कंपनीने ट्रॅक्टरच्या किमतीत वाढ करणार असल्याचे म्हटले आहे.
कोणत्या ट्रॅक्टरच्या दरात किती वाढ केली आहे याचा तपशील लवकरच वितरकाकडे पाठविण्यात येणार असल्याचे कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. दरम्यान, बीएमडब्ल्यू कंपनीनेही आपल्या प्रवासी वाहनांच्या दरात दोन टक्क्यांनी वाढ केली आहे .