सातारा – वाई तालुक्यातील विरमाडे येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुडगूस घालत 11 ठिकणी घरफोड्या केल्या. एकाच रात्री झालेल्या 11 घरफोड्यांमुळे विरमाडे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, रमेश कीर्तने, रामचंद्र सोनावणे, अनिता कचरे, विश्वास श्यामराव सोनावणे, प्रणिल संजय सोनावणे, अजय सोनावणे, श्रीकांत गोविंद सोनावणे, बबन कृष्णा सोनावणे, प्रदीप नामदेव पवार, मिलिंद सुरेश पवार, दत्तात्रय नथु सोनावणे या 11 जणांची बंद घरे चोरट्यानी फोडली आहेत. या घरफोड्याप्रकरणी भुईंज पोलिसांकडून तपास सुरू आहे. अधिक माहिती अशी, महामार्गाला लागून असलेल्या विरमाडे येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील बंद असणारी घरे टार्गेट करून घरफोड्या केल्या.
एका घरात घरफोडीचा प्रयत्न सुरू असताना शेजारील घरातील एका व्यक्तीला जाग आल्याने त्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित चोरट्यांनी त्याला वीट फेकून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पलायन केले. त्यांनतर गावात या घटनेची माहिती समजताच गावातील काही तरुणांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी काही चोरटे महामार्गाच्या दिशेने निघाल्याचे दिसताच युवकांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी युवक व चोरट्यांमध्ये झटापटही झाली. मात्र, चोरट्यांकडे धारदार हत्यारे असल्याने चोरटे पसार झाले.
11 ठिकाणी घरफोड्या झाल्याचे समजताच विरमाडेसह परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे सहकाऱ्यांसमवेत विरमाडे येथे दाखल झाले. त्यांनी तात्काळ श्वानपथकास पाचारण करत चोरी झालेल्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
मौल्यवान चांदीच्या मुखवट्यांची चोरी टाळली
ग्रामदैवत बाळसिद्धनाथ देवाचे पुजारी रमेश कीर्तने यांच्या घरातील कपाटात देवाचे चांदीचे मुखवटे व सोन्याची कर्णफुले होती. मात्र, चोरट्यांनी ती कपाटातून काढून खाली टाकली. त्यामुळे देवाच्या अडीच लाखांच्या मुखवट्याची चोरी होता होता वाचली.