रिऍल्टी क्षेत्र अजूनही पूर्वपदावर नाही- सतीश मगर

मागणी वाढण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याची गरज

पुणे – करोनामुळे अस्ताव्यस्त झालेले रिऍल्टी क्षेत्र अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. केंद्र आणि राज्य सरकारने बऱ्याच उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती सकारात्मक दिशेने वाटचाल करीत आहे. आगामी काळातही मागणी वाढण्यासाठी आणि नवे प्रकल्प वेगाने उभे राहावे याकरिता उपाययोजना करण्याची गरज आहे, असे क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी म्हटले आहे.

रिऍल्टी क्षेत्राचा वार्षिक आढावा घेताना मगर म्हणाले की, करोनाच्या धक्‍क्‍याअगोदरच बऱ्याच कारणांमुळे रिऍल्टी क्षेत्राची परिस्थिती बिघडली होती. त्यातच करोना उद्‌भवल्यानंतर एप्रिल ते जून या काळात हे क्षेत्र पूर्णपणे बंद पडले होते.  केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने या क्षेत्रात सुधारणा व्हाव्यात यासाठी काही उपाययोजना केल्या. त्यामध्ये कर्जाचा हप्ता न भरण्याची सवलत, कमी झालेले व्याजदर, रखडलेल्या घरासाठी उपलब्ध केलेले 12 हजार कोटी रुपये, सर्कल रेटपेक्षा 20 टक्के कमी दराने घराची विक्री केल्यास प्राप्तिकरात सवलत इत्यादीचा समावेश आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यानी मुद्रांक शुल्कात मर्यादीत काळासाठी कपात जाहीर केल्यामुळे घर विक्री वाढण्यास मदत झाली. मात्र एक वेळ कर्जाची फेररचना करण्याची दिलेली सवलत यासाठीचे नियम गुंतागुंतीचे असल्यामुळे 95 टक्के विकसांना या सवलतीचा लाभ घेता आला नाही.

रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध उपाययोजनांमुळे या क्षेत्रातील मरगळ कमी होण्यास मदत झाली असली तरी हे क्षेत्र अजूनही पूर्वपदावर आले नाही. त्यामुळे आगामी काळात मागणी आणि पुरवठा वाढेल या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मगर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.