पुणे – महापालिकेच्या बहुचर्चित भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या 20 डिसेंबर महापालिकेच्या नवीन इमारतीच्या सभागृहात ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याबाबतचे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन्ही नेत्यांना नुकतेच पाठविले असून प्रशासनाकडून कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे. दोन्ही नेत्यांना एकत्र आणत महापौरांकडून या योजनेच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
शहराच्या पूर्वभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने 2013 मध्ये भामा-आसखेड योजनेचे काम सुरू केले होते. तब्बल आठ वर्षांनंतर शेकडो अडथळे पूर्ण करत काम पूर्ण झाले. भामा-आसखेड धरणातून 42 किलोमीटरवरून 418 कोटी रुपयांचा खर्च करून ही योजना पूर्ण केली आहे. तर, योजनेची चाचणी जवळपास संपली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
उद्घाटनावरून वाद
योजनेचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत वाद सुरू आहे. योजनेचा फायदा प्रामुख्याने वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना होणार असल्याने या मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी योजनेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्याचे जाहीर केले होते. त्यावर आक्षेप घेत योजनेच्या मान्यतेसह काम पूर्ण होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुढाकार घेतला असून महापालिकेने आधीच त्यांच्या हस्ते उद्घाटनचा ठराव केल्याचे सांगत मुळीक यांच्यावर योजनेचे श्रेय लाटत असल्याची टीका केली होती. त्यामुळे या वादावर तोडगा काढता महापौरांनी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते उद्घाटनाचा तोडगा काढला आहे. या पूर्वीही बाणेर येथील पालिकेच्या कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी हे दोन्ही नेते उपस्थित होते.