पुणे – कर्जाची रक्कम फेडल्यानंतरही आणखी पैशाची मागणी करत एका व्यवसायीकाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला नग्न करुन जबर मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ बनवून पैसे न दिल्यास तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तातडीने हालचाल करत तीघांना अटक केली आहे.
अविनाश कांबळे(28,रा.टिंगणेनगर), तुषार शेळके, तानाजी जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास शहाजीराव कांबळे(36,रा.उत्तरेश्वर नगर लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विकास कांबळे याचा रॉयल सोल्यूशन नावाने टेली मार्केटींगचा व्यवसाय आहे. त्याने अविनाश कांबळेकडून पाच लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याने फेडले होते. यानंतरही अविनाश अव्वाच्या सव्वा व्याजाची रक्कम विकासकडे मागत होता. मात्र मध्यंतरी लॉक डाऊन झाल्याने विकासचा व्यवसाय बसला होता. यामुळे तो व्याजाची रक्कम देऊ शकला नाही.
याचा राग मनात धरत बुधवारी अविनाश हा विकासच्या कार्यालयाखाली आला. त्याने विकासला खाली बोलावून घेतले. यानंतर त्याला दुचाकीवर बसवून कळसगावातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याला कपडे उतरवण्या लावून तुषार व तानाजीच्या मदतीने कमरेच्या पट्टयाने मारहाण करण्यात आली. याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रकरण करण्यात आले.
पैसे न दिल्यास हे चित्रकीरण व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहेत.