Farmer Protest Update : शेतकरी निदर्शनांना ‘हिंसक’ वळण; शेतकऱ्यांवर ‘अश्रुधुर’, पाण्याचा मारा

रस्ता अडवण्यसाठी लावलेले ट्रक, ट्रॅक्‍टरला बांधून बाजूला केल्याने संघर्ष

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर जमा झाले आहेत. त्याच्या निदर्शनांना शुक्रवारी हिंसक वळण लागले. पोलिसांनी शेतकरी निदर्शकांवर अश्रुधुराचा आणि पाण्याचा मारा करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र निदर्शक त्याला बधले नाहीत.

सिंघू सीमेवर पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या गटाला पांगवण्यसाठी दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तर तिगरी सीमेवर त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. राजधानीत हे निदर्शक पोहोचू नये म्हणून पोलिसांकडून प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे.

सिंघु सीमेवर सगळीकडे धूरच धूर भरला होता. त्यावरून अश्रुधुराच्या अनेक नळकांडी फोडली असावीत, असा अंदाज बांधता येत होता. तर टीगरी सीमेवर पोलिसांनी निदर्शकांना अडवण्यासाठी ट्रक आडवे लावले होते. ते ट्रॅक्‍टरला लोखंडी साखळीने बांधून बाजूला काढण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली त्यावेळी पोलिसांशी त्यांचा संघर्ष उडाला. राजधानीत पंजाबमधून येण्यसाठी थेट मार्ग असणाऱ्या सिंघू सीमेवर पोलिसांनी अनेक पदरी अडथळे उभे केले आहेत. निदर्शकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यसाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.

करोनाच्या साथीमुळे कोणत्याही सभा, निदर्शने आथवा धरणे आंदोलनाला परवानगी नसल्याचे निदर्शकांना यापुर्वी कळवले आहे. त्यामुळे त्यांना पांगवण्यसाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. त्यांना दिल्लीत येण्यास परवानगी नाकारली आहे. तरीही त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या निदर्शनामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाली. बाह्यवळण रस्ता, मकबरा चौक, जीटीके रस्ता, एनएच 44 आणि सिंघू सीमेवर जाण्याचे दिल्लीकरांनी टाळावे, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी ट्‌विटद्वारे केले आहे.

स्थानिक पोलिसांनी टिकरी सीमा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केली आहे. किसान संघर्ष समितीच्या आंदोलानामुळे या मार्गावरून मोटारींनी वाहतूक करू नये, असे आवाहन केले आहे. दिल्ली गुरगाव महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ललरू, शंभू, पतियाळा – पेहोवा, पेटरण- खनौरी, मुनाक- तोहना, रतिया -फतेहबाद आणि तिलवंडी – सीसरा अशा अनेक मार्गांनी आम्ही दिल्लीत दाखल होऊ शकतो, असे समितीने जाहीर केले आहे.

निदर्शक जमा होऊ नयेत म्हणून हरियाणा सरकारने जागोजागी जमावबंदी जारी केली आहे. शेतकऱ्यांना जेथे अडवण्यात येते तेथेच ते धरणे आंदोलन सुरू करत आहेत. त्यांच्या सोबत असणाऱ्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीत अन्न धान्याचा साठा ठेवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.